पूँछ: जम्मू-काश्मीरच्या पूँछमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी 2 संशयित दहशतवाद्यांना ठार केले आहे. हे दहशतवादी देगवार टेरवानमधील नियंत्रण रेषा पार करुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा पूँछमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळण्यात आला.
लष्कर अधिकाऱ्याने दिली माहिती: जम्मू क्षेत्राचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बर्तवाल म्हणाले की, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने 2 दहशतवाद्यांना ठार केले आहे. एका दहशतवाद्याचा जागेवरच खात्मा झाला. तर दुसरा दहशतवादी हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यादरम्यान त्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्यात तो मारला गेला. तो नियंत्रण रेषेजवळ पडला असून सुरक्षा रक्षक त्याचा शोध घेत आहेत.
गढी बटालियन पूँछ येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी देगवार टेरवान येथे दोन पुरुष नियंत्रण रेषा ओलांडताना दिसले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या दोन जणांपैकी एकजण जागेवरच कोसळला. तर दुसरा पिंटू नाल्याकडे जाताना दिसून आला. त्याच्यावर सुरक्षा रक्षक दलाकडून गोळीबार करण्यात आला. त्याच परिसरात तो पडला असून तेथे शोध मोहीम राबवली जात आहे. - पीआरओ लेफ्टनंट कर्नल, सुनील बर्तवाल