इंदूर (मध्य प्रदेश) : इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीच्या दिवशी झालेल्या दूर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेमागची कहाणी समोर आली आहे जी अत्यंत धक्कादायक आहे. मंदिराच्या आवारातील पुरातन विहीर झाकण्यासाठी मंदिरातील काही कामगारांनी छताचा स्लॅब टाकला होता. एवढेच नव्हे तर पायरीच्या बाजूच्या रेलिंगवरही स्लॅबचा भार टाकण्यात आला होता. प्रचंड गर्दीचा भार उचलता न आल्याने रेलिंग व स्लॅब तुटून हा अपघात झाला.
मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत :मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरमधील रामनवमी घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. इंदूरच्या स्नेह नगरमध्ये महादेव मंदिराच्या आवारात जवळपास 7 दशकांपासून एक विहीर आहे. येथे लोक पूजा करण्यासाठी येतात. गेल्या महाशिवरात्रीलाही येथे हजारोंची गर्दी जमली होती. त्यानंतरही या विहिरीवर लोकांची ये-जा सुरू होती. असा अपघात महाशिवरात्रीला झाला असता तर मृतांची संख्या 200 वर पोहोचली असती, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.