नवी दिल्ली - भारताच्या इतिहासात 31 ऑक्टोबर ही तारीख माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा दिवस म्हणून नोंदवली जाते. धाडसी निर्णय घेणार्या आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा या पदावर पोहोचल्या. आणि पदावर असताना 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या झाली. माजी पतंप्रधान इंदिरा गांधींच्या स्मृतीदिनानिमित्त शक्तिस्थळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिवादन केले. तसेच अनेक मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.
'आयरन लेडी' इंदिरा गांधींचा स्मृतीदिन इंदिरा गांधींचे धाडसी निर्णय -
इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ला अलाहाबाद इथं झाला. इंदिरा म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासातलं अपूर्व पर्व. पित्याचा यशस्वी वारसा घेऊन राजकीय क्षितिजावर अवतरलेल्या इंदिरा यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषविताना आपल्या धाडसी निर्णयांनी आणि धडाकेबाज कार्यशैलीनं संपूर्ण राजकारणावरच आपला अमीट ठसा उमटवला.
- बँकांचे राष्ट्रीयीकरण - भारताच्या विकासात हातभार लावणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून बँकांनी आपली भूमिका सिद्ध केली होती. तसेच बँकांची मोठ्या प्रमाणात रोजगार पुरविण्याची क्षमता होती. म्हणून १९६० च्या सुमारास बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची चर्चा सुरू झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वार्षिक अधिवेशनात निबंध सादर करून सरकारचा बँक राष्ट्रीयीकरणाचा हेतू जाहीर केला. त्याचं स्वागत झाले. त्यानंतर एक अध्यादेश काढून देशातील १४ मोठ्या बँकांचे १९ जुलै १९६९ च्या मध्यरात्रीपासून राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
- आणीबाणी- १२ जून १९७५ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अलाहबाद उच्च न्यायालयानं इंदिरा गांधी यांची लोकसभा निवडणूक रद्द केली होती. त्यानंतर २५ जून १९७५च्या मध्यरात्री त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून आपल्याकडं अमर्याद अधिकार घेतले आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संकोच केला. शेकडो विरोधकांना तुरुंगात डांबले. आणीबाणीला विरोध करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना; तसंच लेखक, पत्रकार यांनाही तुरुंगाची हवा खायला लावली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक 'काळे पर्व' म्हणूनच त्याच्याकडं पाहिले जाते.
- ऑपरेशन ब्यू स्टार- ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात शीख फुटीरवादी स्वतंत्र खलिस्तानाचं स्वप्न पाहात होते. त्यांचा म्होरक्या संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या चेल्यांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिरात आश्रय घेऊन, या पवित्र धार्मिक स्थळाचं रूपांतर एका सशस्त्र गडात केले होते. सरकारबरोबरील अनेक वाटाघाटी आणि चुकांनंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. ते होते 'ऑपरेशन ब्लू स्टार'. फुटीरतावाद्यांना बाहेर काढण्यासाठी लष्करानं हल्ला केला व दोन दिवसांच्या संघर्षानंतर त्यांचा पराभव केला. दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आणि सुवर्ण मंदिराचा परिसर गोळीबारामुळं उद्ध्वस्त झाला. त्यानंतर संपूर्ण पंजाबमध्ये अस्थिरता पसरली, दहशतवादी सक्रिय झाले आणि सरकारला आणीबाणीचे नियम वापरून सशस्त्र कारवाई करावी लागली. या अस्थिरतेचा कळस म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्या शीख अंगरक्षकांनीच हत्या केली.
- ऑपरेशन मेघदूत - सियाचिनच्या दक्षिण पश्चिम सीमेला ‘सल्तारो’ नावाची पर्वतरांग आहे. यापलीकडं पाकव्याप्त काश्मीर आहे. उजव्या बाजूला अक्साई चीन आहे. १९७१च्या भारत-पाक युद्धानंतर ‘सिमला करार’ झाला आणि नियंत्रण रेषा (एलओसी) अस्तित्वात आली. यापूर्वी या रेषेला शस्त्रसंधी रेषा (सीझफायर लाइन) संबोधले जायचं. सियाचिन ग्लेशिअरच्या ‘एनजे ९८४२’ या पॉइंटपासून आखलेली ‘एलओसी’ स्पष्ट नव्हती. या पूर्ण ग्लेशिअरला भारत आपला समजतो. मात्र, तो भाग आपला आहे असं म्हणत १९७१नंतर पाकिस्ताननं सियाचिनच्या वेगवेगळ्या भागांवर ताबा घेण्याकरिता मोहिमा सुरू केल्या. इंदिरा यांनी परवानगी दिल्यानंतर १३ एप्रिल १९८४ला भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन मेघदूत’ सुरू केलं आणि पूर्ण ‘सियाचिन ग्लेशिअर’ आपल्या ताब्यात घेतला होता.
- अणुचाचणी - अणुऊर्जेचा शांततामय मार्गानं वापर करण्यासाठी भारतानं १९७४मध्ये पोखरण इथं पहिल्यांदा अणुचाचणी घेतली. 'स्मायलिंग बुद्ध' या नावानं ओळखल्या गेलेल्या या प्रकल्पाची माहिती त्या काळी प्रचंड गोपनीय ठेवण्यात आली होती.तत्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंह यांनासुद्धा चाचणीच्या ४८ तास आधीच याची माहिती देण्यात आली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं मात्र या संपूर्ण प्रकल्पावर आधीपासूनच बारीक लक्ष होतं.
पुण्यात इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ आर्ट गॅलरीचे उद्घाटन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते पुण्यात इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या शहर विभागातर्फे बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. काँग्रेस नेते अभय छाजेड हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.