उदयपूर (राजस्थान) : DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, अफसर हुसैन नावाच्या प्रवाशाने पाटण्याला जाण्यासाठी इंडिगो फ्लाइटचे (6E-214) तिकीट बुक केले होते. नियोजित फ्लाइटमध्ये बसण्यासाठी तो 30 जानेवारीला दिल्ली विमानतळावर पोहोचला. परंतु तो चुकून उदयपूरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट (6E-319) मध्ये चढला. काही तासांनी फ्लाइट उदयपूर विमानतळावर पोहोचली. तेथे उतरल्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात आली. त्यानंतर प्रवाशाने विमानतळावरील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून इंडिगोच्या जवानांनी प्रवाशाला त्याच दिवशी दुसऱ्या फ्लाइटने पाटण्याला पाठवले.
एअरलाइन कंपनीचे स्पष्टीकरण : एअरलाइनने या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला (6E319) दिल्ली-उदयपूर फ्लाइटमधील प्रवाशासोबत झालेल्या घटनेची माहिती आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्याचवेळी, डीजीसीएने आता या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. विमान वाहतूक नियामकाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणी चौकशी अहवाल मागवित आहोत आणि विमान कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल. तपासात डीजीसीए प्रवाशाचा बोर्डिंग पास व्यवस्थित का स्कॅन केला गेला नाही यामागील कारण शोधले जाईल. डीजीसीएने सांगितले की, बोर्डिंग करण्यापूर्वी बोर्डिंग पास नियमानुसार दोन ठिकाणी तपासला जातो. असे असतानाही प्रवासी चुकीच्या विमानात कसा चढला हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे.