नवी दिल्ली :केंद्र सरकारने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत जवळपास 20 कोटी कुटुंबांच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची मागणी वाढली (demand for national flag has increased) आहे.
या उपक्रमामुळे, तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे आणि ती विक्रमी संख्येपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी, नवी दिल्ली येथील अब्दुल गफ्फार हे कठोर मेहनत करीत आहेत. ते गेल्या 60 वर्षांपासुन झेंडे शिवण्याचे व विकण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची ओळख 'ध्वज काका' (Abdul Ghaffar India flag uncle) अशी निर्माण झाली आहे. 'हर घर तिरंगा' हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यांचे वय 71 वर्ष आहे. तरी देखील, सदर बाजारच्या पान मंडी मार्केटमधील "भारत हँडलूम" नावाच्या दुकानात ते आपल्या माणसांसोबत रात्रंदिवस काम करतात. एका दिवसात 1.5 लाख तिरंगे बनवण्याचा विक्रम त्यांनी व त्यांच्या कारागिरांनी मोडला आहे.
आश्चर्य म्हणजे, आतापर्यंत अब्दुल गफार यांनी अडीच महिन्यांत देशभरात 65 लाखांहून अधिक ध्वजांचा पुरवठा केला आहे. परंतु 13 ऑगस्टपर्यंत कोणत्याही किंमतीत आणखी 35 लाख ध्वजांचा पुरवठा मार्केटमध्ये करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मार्केटमध्ये ग्राहकांना एक कोटीच्या वर तिरंगा तयार करुन देऊन, ते स्वत:चा एक विक्रम मोडणार आहे.