जम्मू : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील अंजी खड येथे देशातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व टीमचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हे काम काश्मीर खोरे आणि देशाच्या उर्वरित भागांमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटीशी जोडणार आहे. या पुलाचा व्हिडिओ शेअर करत वैष्णव यांनी ट्विट केले की, भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल (अंजी खड्डा) 11 महिन्यांत तयार झाला आहे. या पुलाची एकूण लांबी 653 किमी आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
37,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प या वर्षअखेरीस पूर्ण : रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, उत्कृष्ट. यूएसबीआरएलवर नदीपात्रापासून 331 मीटर उंचीवर केबल-स्टेड अंजी खड्डा पूल पूर्ण करणे ही भारतीय रेल्वेने मिळवलेली आणखी एक मोठी उपलब्धी आहे. 37,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची रेल्वेला अपेक्षा आहे. रेल्वे राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोश यांनी देशातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचे पूर्णत्वास कठीण भौगोलिक स्थिती असूनही 'आणखी एक मैलाचा दगड' असल्याचे म्हटले आहे.