नवी दिल्ली -जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी 3 कोटीचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 4 लाख लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 46,617 कोरोना रुग्ण आढळले असून 853 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, सर्वांत जास्त 1,22,197 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामुक्त झाल्याचा आकडेवारी 58 लाख आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 97.01 टक्क्यांवर पोहचला आहे.
एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 3,04,58,251 वर पोहचली आहे. यामध्ये 5,09,637 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 2,95,48,302 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर आतापर्यंत 4,00,312 जणांचा बळी गेला आहे. तसेच देशातील कोरोना चाचणीचा आकडा वाढला असून गुरुवारी दिवसभरामध्ये 18,80,026 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण 41,42,51,520 चाचण्या पार पडल्या आहेत.
लसीकरण मोहिमेचा 34 कोटींचा टप्पा पार -
कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतात लसीकरण मोहिमेनं काल 34 कोटींचा टप्पा पार केला आहे. देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 34 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात 42,64,123 जणांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत 34,00,76,232 जणांचे लसीकरण झाल्याचे आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई -
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) कुटुंबीयांना किमान मदत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं ही रक्कम येत्या सहा आठवड्यात निश्चित करण्याचं प्राधिकरणाला सांगितलं आहे.
हेही वाचा -कोरोना काळात मास्क व्यवस्थित कसा घालावा? त्याची विल्हेवाट कशी लावावी?...वाचा हा लेख