नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार आता भारतीयांना श्रीलंकेत युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. यामुळे भारतीय चलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक लोकप्रियता मिळेल, असे तज्ञांचे मत आहे.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. विक्रमसिंघे गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत पोहोचले. गेल्यावर्षी अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडल्यानंतर श्रीलंकेच्या वरिष्ठ नेत्याची ही पहिलीच भारत भेट आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात, पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी श्रीलंकेला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एक जवळचा मित्र म्हणून आम्ही या संकटाच्यावेळी श्रीलंकेच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. ते म्हणाले की, श्रीलंकेत UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये फिनटेक कनेक्टिव्हिटी स्थापित होईल.
UPI ला परवानगी देणारा भूतान पहिला देश : श्रीलंका आता नवीनतम देश बनला आहे, जो आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी यूएस डॉलरऐवजी भारतीय रुपया स्वीकारेल. जुलै 2021 मध्ये, मोबाइल आधारित पेमेंटसाठी UPI आणि BHIM अॅप वापरणारा भूतान पहिला देश बनला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीदरम्यान या दोन देशांनी UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.