नवी दिल्ली :भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात भारतीय स्टार कुस्तीपटूंनी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने सुरूच ठेवली आहेत. कुस्तीपटूंच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाचा दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत मौन धारण करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर ते आपला मुद्दा मांडणार आहेत. आदल्या दिवशी, भारताची स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी WFI अध्यक्षांवर लैंगिक शोषणासह छळाचे गंभीर आरोप केले होते.
महासंघाला 72 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश : या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाला येत्या 72 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, ब्रिजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी खेळाडूंकडून सातत्याने होत आहे. साक्षी मलिक, विनेश फोगट, संगीता फोगट, अंशू मलिक, बजरंग पुनिया, सत्यव्रत काद्यान यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू WFI च्या मनमानी धोरणांविरुद्ध आणि ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहेत.
आंदोलनाला सर्वत्र पाठिंबा : आता खेळाडूंच्या या आंदोलनाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. गीता फोगट, बबिता फोगट यांच्यासह इतरांनी या प्रकरणावर ट्विट करून आंदोलन करणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. यासोबतच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही बुधवारी संध्याकाळी उशिरा विनेश फोगट यांची भेट घेतली आणि त्यांना आपला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांना नोटीसही पाठवण्यात आली आहे.