हैदराबाद : हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सामन्य नागरीक ते संरक्षण क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी हनी ट्रॅपचे शिकार होत आहेत. बहुतेक वेळेस हनी ट्रॅप आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही होत असते. शत्रू राष्ट्र हनी ट्रॅपच्या मदतीने सुरक्षेची माहिती मिळवत असतात. पाकिस्तानही भारताविरोधात लढाई करण्यासाठी हनी ट्रॅपचा उपयोग करत असतो. आयएसआय अनेक सैन्य अधिकारी आणि जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत आहे.
हनी ट्रॅपमध्ये डीआरडीओचे दोन अधिकारी अडकले :पुण्यातील डीआरडीओ या संस्थेतील अधिकारी देखील यात अडकले आहेत. गेल्या दोन वर्षात डीआरडीओमधील दोन अधिकाऱ्यांना अशा प्रकरणात अटक झाली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी डीआरडीओमधील काही संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला दिल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना एटीएसने आज या प्रकरणात अटक केली आहे.
न्यूड फोटोनंतर ब्लॅकमेल :कुरुलकर यांच्याशी सोशल मीडियावर संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादित करत त्यांना न्यूड फोटो आणि व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. कुरुलकर यांनीही न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात येऊ लागलं. बदनामी होईल या धाकाने कुरुलकर यांनी देशाची गोपनिय माहिती आयएसआयला दिली आहे.
डीआरडीओचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी बाबुराम दे :डीआरडीओचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी बाबुराम दे हे ओडिसातील चांदीपूर येथे कार्यरत होते. 51 वर्षीय तांत्रिक अधिकारी बाबुराम दे हेही हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तहेरांना डीआरडीओमधील संवेदनशील माहिती दिली होती. व्हाट्सअॅपद्वारे फोटो आणि व्हिडिओ काढून मिसाईल लॉन्चिंगची माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली होती.
सेक्स चॅटमुळे अडकतात जाळ्यात :हनी ट्रॅपमध्ये लष्करातील जवान देखील अडकवली आहेत. त्यांना त्यात अडकवल्यानंतर त्यांच्याकडून भारताच्या सुरक्षेची माहिती मिळवली जात आहे. दरवर्षी एक अधिकारी पाकच्या हनी ट्रॅपमध्ये अडकत आहे. यामुळे लष्करात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांशी जवळकीता साधून त्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले जात आहे.
98 अधिकाऱ्याचा संगणक हॅक :पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी सेजल कपूर या बनावट नावाच्या आधारे फेसबुकवर 98 लष्कर अधिकाऱ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांचे कॉम्प्युटर हॅक केले होते. यात भूदल, नौदल, वायूदल याचबरोबर पॅरामिलिट्रीचे अधिकारी होते. अनेकवेळा सेक्स चॅटच्या मोहापायी अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकत असतात. एक हवाई दलाच्या जवानाने फक्त सेक्स चॅट करण्यासाठी आयएसआयच्या एजंटला आयएएफच्या युद्धाची माहिती दिली होती. किरण रंधवा असे या आयएसआयच्या एजंटचे नाव होते.