नवी दिल्ली - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Ukraine-Russia conflict ) पुकारलं आहे. रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे सैन्य निकाराने लढा देत आहेत. रशियाने सुरु केल्या या युद्धाचे पडसाद सुंपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थी ( Indian Students In Ukraine ) आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या चार मंत्र्यांना युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन निर्वासन मोहिमेत भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सुचवले होते. त्यानुसार निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये गेले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया बुखारेस्ट, रोमानिया येथे पोहोचले आहेत. तर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू विशेष दूत म्हणून स्लोव्हाकियात पोहचले आहेत. याशिवाय, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी बुडापेस्ट, हंगेरी येथे पोहोचले. तर जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे पोलंडला पोहचले आहेत. हे चारही नेते भारताचे विशेष दुत म्हणून युक्रेनमधून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सरकारमध्ये समन्वय साधण्याचे काम करत आहेत.