नवी दिल्लीIndian Government Advisory On Canada: केंद्र सरकारनं कॅनडामध्ये राहणाऱ्या, तसंच कॅनडात जाण्याची योजना आखणाऱ्या भारतीयांसाठी एक नोटीस जारी केली आहे. कॅनडामध्ये ज्या भागात भारतीय नागरिकांना लक्ष्य केलं त्या भागात भारतीय नागरिकांनी जाणं टाळावं, असं त्यात म्हटलं आहे.
कॅनडात जाणं टाळावं : परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या ॲडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे की, कॅनडात भारतीय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं भारतीयांनी अशा घटना घडलेल्या ठिकाणी जाणं टाळावं असं अवाहान यात करण्यात आलं आहे. कॅनडामधील आमची उच्चायुक्तालय, वाणिज्य दूत कार्यालयं भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी त्यांच्या संपर्कात राहतील, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
अत्यंत सावधगिरी बाळगा :विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडातील बिघडलेल्या सुरक्षा वातावरणामुळं अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालय कॅनडामध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल अत्यंत चिंतित आहे. या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी जारी केलेल्या ॲडव्हायजरीमध्ये म्हटलंय. दरम्यान, दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळं कॅनडामध्ये राहणारे भारतीय वंशाचे विद्यार्थीही घाबरले आहेत. कॅनडामध्ये एकूण 2 लाख 30 हजार भारतीय विद्यार्थी राहतात, तसंच 7 लाख अनिवासी भारतीय आहेत.
भारतीय नागरिकांना धमक्या : मंत्रालयानं म्हटलं आहे की, 'अलीकडेच भारतीय राजदूत तसंच भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीय समुदायाच्या एका वर्गाला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळं भारतीय वंशाच्या लोकांनी अशा घटना घडलेल्या किंवा अशा घटना घडण्याची शक्यता असलेल्या भागात जाऊ नये. भारत, कॅनडामधील तणावादरम्यान खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसनं हिंदू समुदायाच्या लोकांना कॅनडा सोडण्याची धमकी दिली आहे. यानंतर अतिरेकी भारतीय वंशाच्या लोकांना लक्ष्य करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतानं यापूर्वीही अशा घटनांचा निषेध केलाय.
हेही वाचा -
- Canada Travel Advisory : 'जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळा', कॅनडानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अॅडव्हायझरी
- Justin Trudeau Reaction : 'भारताला चिथावण्याचा प्रयत्न नाही, आम्ही तर फक्त..', मोदी सरकारच्या पलटवारानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले
- Canada Indian Diplomat : कॅनडातून भारतीय राजदूताची हकालपट्टी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंनी केले गंभीर आरोप; भारताचं प्रत्युत्तर