नवी दिल्ली- पाकिस्तानचे नापाक कृत्ये आणि चीनच्या कुरापतींचा नेहमीच सामना करणाऱ्या भारताचे लष्करी सामर्थ्य आणखी वाढणार आहे. भारतीय सैन्यदलाने मेक इन इंडियातंर्गत १,७५० भविष्यातील पायदळ लढाऊ वाहनांच्या (एफआयसीव्ही) खरेदीचे नियोजन केले आहे. ही लढाऊ वाहने शत्रुसैन्याचे टँक आणि तुकड्या उद्धवस्त करण्यासाठी कामी येणार आहेत. पूर्व लडाखमध्ये ही वाहने तैनात करण्याची सैन्यदलाची इच्छा आहे.
सैन्यदलाच्या आधुनिकीकरण करण्यासाठी अनेक दिवसांपासून एफआयसीव्हीच्या खरेदीचे नियोजन करण्यात आलेले आहे. विशेषत: लडाखमध्ये तणावाची स्थिती असताना अशा लढाऊ वाहनांची खरेदी करण्याची सैन्यदलाला आवश्यकता भासत आहे.
हेही वाचा-मुंबईत पेट्रोल आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!
कमी वजनाच्या ३५० टँकची टप्प्याटप्प्याने होणार खरेदी
भारतीय सैन्यदलाने कमी वजनाचे ३५० टँक टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. या टँकमध्ये नवीन तंत्रज्ञान, अभियांत्रिकीचे सहकार्य, देखभाल आणि प्रशिक्षणाची पूर्तता करण्याची क्षमता आहे. कमी वजनाचे टँक हे मेक इंडिया योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी खरेदी करण्यात येणार आहे. २५ टनाहून कमी वजनाचे टँक हे दुर्गम भागात, डोंगराळ प्रदेशात व कठीण मोहिमांमध्ये वापरण्यात येणार आहेत. कमी वजनाच्या टँकमध्ये शस्त्रास्त्रांसह संरक्षणाची पुरेशी सिद्धता असते. त्याचा सध्याच्या धोक्याच्या स्थितीत वापर होणे अधिक योग्य ठरते.
हेही वाचा-सोनिया गांधींनी बोलावली AICC ची बैठक; कोरोना आणि इंधन दरवाढीवर चर्चा
गेल्या वर्षी पूर्व लडाखमध्ये चीन व भारताचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कमालीची तणावाची स्थिती निर्माण झाली होती.