भरतपूर (राजस्थान) : भारतीय हवाई दलाचे मिग विमान शनिवारी सकाळी भरतपूर जिल्ह्यातील उचैन भागात कोसळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे.
सकाळी 10.30 वाजता अपघात : हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा एअरफोर्स स्टेशनवरून या विमानाने उड्डाण घेतल्याची शक्यता आहे. सध्या हवाई दल अपघाताचे कारण शोधत आहे. संरक्षण पीआरओ कर्नल अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळाली आहे. कोणत्या विमानाला अपघात झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. नगला बिजा येथील ग्रामस्थांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास अचानक आकाशातून उडणारे एक लढाऊ विमान लोकवस्तीच्या बाहेरील शेतात पडले. अपघाताच्या आवाजाने संपूर्ण गावात खळबळ उडाली. त्यानंतर गावातील शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. विमानाचे तुकडे गावाबाहेर सर्वत्र विखुरले होते.