पॅरिस: भारताला मार्च 2023 पर्यंत संपूर्ण 5G सेवा मिळेल, असे केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 15 जून रोजी व्हिवा टेक्नॉलॉजी 2022 कार्यक्रमात सांगितले. एएनआयशी बोलताना वैष्णव म्हणाले की, 5G स्पेक्ट्रमचा लिलाव जुलैअखेर पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले, "टेलिकॉम हा डिजिटल वापराचा प्राथमिक स्रोत आहे. टेलिकॉममध्ये विश्वासार्ह समाधान आणणे खूप महत्वाचे आहे. भारताकडे स्वतःचे स्टॅक आहे. देशात 5G प्रयोगशाळेत तयार आहे आणि 5G मार्च 2023 मध्ये सुरू करण्यासाठी देश सज्ज असेल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली ज्याद्वारे सार्वजनिक आणि उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी यशस्वी बोलीदारांना स्पेक्ट्रम नियुक्त केले जाईल. केंद्राकडे, 2014 मधील 10 कोटी ग्राहकांच्या तुलनेत आज 80 कोटी ग्राहकांना ब्रॉडबँडचा वापर आहे.
5G स्वदेशी विकासाकडे वाटचाल - देशात निर्माण झालेली 4G इकोसिस्टम आता 5G स्वदेशी विकासाकडे जात आहे. भारतातील 8 प्रमुख तंत्रज्ञान संस्थांमधील 5G चाचणी सेटअप भारतातील देशांतर्गत 5G तंत्रज्ञानाच्या लाँचला गती देत आहे. मोबाइल हँडसेट, दूरसंचार उपकरणांसाठी PLI (उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह) योजना आणि भारत सेमीकंडक्टर मिशनची सुरूवात अपेक्षित आहे. भारतात 5G सेवा सुरू करण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम यामुळे तयार करण्यात मदत होत आहे. 5G तंत्रज्ञान आणि आगामी 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत एक अग्रगण्य देश म्हणून उदयास येणार आहे, तो काळ फार दूर नाही, असे केंद्राने म्हटले आहे.
जास्त गतीमानता मिळणार -मिड आणि हाय बँड स्पेक्ट्रमचा वापर दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे 5G तंत्रज्ञान-आधारित सेवा सुरू करण्यासाठी केला जाईल. जे सध्याच्या 4G सेवांद्वारे शक्य आहे त्यापेक्षा सुमारे 10 पट जास्त गती आणि क्षमता प्रदान करण्यास सक्षम असेल.
मंत्रिमंडळाने इंडस्ट्री 4.0 ऍप्लिकेशन्समध्ये नवनवीन शोधांना चालना देण्यासाठीही खासगी कॅप्टिव्ह नेटवर्क्सचा विकास आणि स्थापना सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे जसे की मशीन टू मशीन कम्युनिकेशन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ऑटोमोटिव्ह, आरोग्यसेवा, कृषी, ऊर्जा आणि इतर क्षेत्रे. यामुळे तांत्रिक प्रगतीला नवी चालना मिळणार आहे.