न्यूयॉर्क India Slams Pakistan : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताविरोधात अनेक आरोप केले होते. मात्र त्यांच्या आरोपांना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर खाली करा, दहशतवादाला आवरा आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक नागरिकांवर होणारे अन्याय थांबवा, असा हल्लाबोल भारतानं केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर हा हल्लाबोल केला आहे.
पाकिस्ताननं काश्मीरवरील अनाधिकृत ताबा सोडावा :UNGA समितीच्या बैठकीत पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी काश्मीरचा राग आळवला होता. त्यावर संयुक्त राष्ट्र संघातील सचिव पेटल गेहलोत यांनी भारताच्या वतीनं उत्तर देण्याचा अधिकार वापरला. यावेळी पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला चांगलचं फटकारलं. पाकिस्ताननं भारताच्या भूमीवर अनाधिकृतपणानं ताबा मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्ताननं अगोदर पाकव्याप्त काश्मीर खाली करावा, असं पेटल गेहलोत यांनी यावेळी सुनावलं. पाकिस्ताननं सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवावा आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर आवर घालावा, असे खडे बोल भारतानं पाकिस्तानला सुनावले आहेत.