नवी दिल्ली : हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या नवीन रँकिंगनुसार जपानचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. याचाच अर्थ जपानी नागरिक जगातील 193 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. जपानने या यादीत अव्वल स्थान पटकावण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. या यादीत भारताचा क्रमांक 85 वा आहे. भारतीयांना आता 59 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळणार आहे. तर भारताचा शेजारी देश पाकिस्तानचा क्रमांक 106 वा आहे. पाकिस्तानची अवस्था आफ्रिकेतील सोमालियासारख्या अस्थिर देशापेक्षाही वाईट झाली आहे. या यादीत श्रीलंकेचे रँकिंग 99वे आहे. तर तालिबान शासित अफगाणिस्तानच्या पासपोर्टला निर्देशांकात सर्वात खालचे स्थान मिळाले आहे.
टॉप 3 देश आशियाई : हेन्ले पासपोर्ट इंडेक्स जगातील पासपोर्टची ताकद दर्शवतो. या निर्देशांकाला जगातील सर्व पासपोर्टचे अधिकृत मानांकन मानले जाते. यामध्ये 199 देशांच्या पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहे. निर्देशांकात सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचे पासपोर्ट संयुक्तपणे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत. या दोन आशियाई देशांनंतर जर्मनी, स्पेन, फिनलंड, इटली आणि लक्झेंबर्ग या युरोपियन देशांचा क्रमांक लागतो. जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया हे तीनच आशियाई देश आहेत ज्यांनी 2023 च्या टॉप 10 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट निर्देशांकात स्थान मिळवले आहे.
पाकिस्तानची परिस्थिती वाईट : ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड आणि स्वीडन या देशांचे पासपोर्ट हे जगातील पाचव्या क्रमांकाचे शक्तिशाली पासपोर्ट आहेत. क्रमवारीत युनायटेड किंगडम सहाव्या क्रमांकावर आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा (यूएसए) पासपोर्ट सातव्या क्रमांकावर आहे. येथील नागरिकांना 186 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो. पाकिस्तानी पासपोर्ट हा जगातील चौथा सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे. या क्रमवारीनुसार पाकिस्तानचा 106 वा क्रमांक लागतो. पाकिस्तानातील नागरिकांना जगभरातील केवळ 32 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो.