नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख आज जाहीर जाहीर करण्यात आली ( Presidential Election 2022 ) 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. घटनेच्या अनुच्छेद 62 चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून आज करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा सदस्य हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.
राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांनाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही. 2017 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी 17 जुलै रोजी मतदान झाले होते आणि 20 जुलै रोजी मतमोजणी झाली होती.