नवी दिल्ली - एका दिवसात 1 कोटी नागरिकांना कोरोनाची लस शुक्रवारी देण्यात आल्यानंतर देशातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते डिसेंबर अखेर 18 वर्षावरील लोकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकते.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की लसीकरणातील यशाने देशाच्या आरोग्याची पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन विकसित झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना महामारीने भारताच्या आरोग्य पायाभूत सुविधा व मनुष्यबळाचे संकट दाखवून दिले. मात्र, कालच्या विक्रमी लसीकरणाने परिस्थिती सुधारल्याचे दाखवून दिले.
हेही वाचा-सप्टेंबरमध्ये 'या' 12 दिवशी बँका राहणार बंद, पहा वेळापत्रक
लसीकरण वाढविण्यात खासगी रुग्णालयांचा महत्त्वपूर्ण सहभाग
डॉ. जयलाल म्हणाले, लसीकरण वाढविण्यात खासगी रुग्णालयेदेखील पूर्णपणे सहभागी आहेत. प्रत्यक्षात लोकांनाही लसीकरणाचे महत्त्व समजू लागले आहे. खासगी रुग्णालयांना देण्यात येणारा लशींचा 25 टक्के साठा हा प्रभावीपणे वापरण्यात आला आहे. सरकारने लशींची उपलब्धता, चांगल्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ही सुविधा उपलब्ध झाल्या तर निश्चितच चालू वर्षात डिसेंबर अखेर 18 वर्षांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. जयकर यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण आहे.