नवी दिल्ली India Mobile Congress 2023 : देशातील सर्वात मोठा दूरसंचार कार्यक्रम 'इंडिया मोबाइल काँग्रेस 2023' च्या सातव्या सत्राचं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. गेल्या वर्षी आम्ही 5G रोलआउटसाठी इथं जमलो होतो, तेव्हा संपूर्ण जग भारताकडं आश्चर्यानं पाहत होतं. मात्र आम्ही जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट केलं आणि प्रत्येक भारतीयापर्यंत 5G नेण्याचं काम सुरू केलंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलंय. पुढं बोलताना मोदी म्हणाले की, 2G च्या काळात आपल्या देशात काय घडलं, हे कदाचित नव्या पिढीला कळणार नाही. आपल्या काळात 4G चा विस्तार झाला. तसंच मला विश्वास आहे की, भारत 6G मध्ये जगाचं नेतृत्व करेल. भारताचं सेमीकंडक्टर मिशन केवळ आपल्या देशांतर्गत गरजाच नव्हे तर जगाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून पुढं जात असल्याचं यावेळी मोदी म्हणाले.
आकाश अंबानींनी घेतली मोदींची भेट : कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोठ्या दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना दिसले. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी हेदेखील पंतप्रधानांसोबत दिसले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या कंपनीद्वारे दूरसंचार क्षेत्रात केलेल्या नवकल्पनांची माहिती दिली. तसंच त्यांनी रिलायन्स जिओच्या स्पेस फायबर उपक्रमाबद्दल मोदींना सांगितलं. जे 1 GBPS पर्यंत गती प्रदान करण्यास सक्षम आहे. यासोबतच भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनीही पंतप्रधानांशी चर्चा केली. मोबाइल काँग्रेसमध्ये, भारती एंटरप्रायझेस 5G प्लस, AI-सक्षम तंत्रज्ञान आणि इतर डिजिटल पायाभूत सुविधांसह नवकल्पनाचं भविष्य दाखवत आहे.