हैदराबादIndia Maldives row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपला भेट दिली होती. तसंच त्यांनी तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीनंतर लक्षद्वीप सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, मालदीवच्या काही मंत्र्यांना ही गोष्ट आवडली नाही. यानंतर मालदीव सरकारमधील काही नेत्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णभेदाच्या कमेंट्स केल्या. मालदीवच्या मंत्र्यांनी भारतासंदर्भात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरुन भारतीय संतप्त झाले आहेत. अनेकांनी आपला मालदीवचा दौरा रद्द केलाय.
बॉयकॉट मालदीव :मालदीव प्रकरणावरून संतप्त झालेल्या अनेक भारतीयांनी दौरे व सहली रद्द केल्या आहेत. त्यांनी तशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करून आपला निषेधही व्यक्त केलाय. मी स्वावलंबी आहे, या नावानं सोशल मीडियावर लोकांनी पोस्ट केल्या आहेत. सध्या बॉयकॉट मालदीव (Boycott Maldives) गुगलवर ट्रेंड करत आहे. तसंच भारतीयांनी बहिष्कार टाकल्यानं मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, अशी चिंता मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ यांनी व्यक्त केलीय.
सचिन तेंडुलकरसह सेलिब्रिटींनी केलं आवाहन : याप्रकरणी भारतीय दिग्गजांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, सलमान खान, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेता जॉन अब्राहम यांनी भारतीयांनी मालदीवमध्ये सुट्टी घालवण्याऐवजी लक्षद्वीप अथवा सिंधुदुर्गला जाण्याचं आवाहन केलंय. या संपूर्ण घटनेबाबत अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
काय आहे प्रकरण? : मालदीवचे खासदार जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीवर प्रतिक्रिया देताना एक वादग्रस्त टिप्पणी केली. (भारतीयांच्या) हॉटेलच्या खोल्यांमध्ये कायमच वास असतो, अशा आशयाची त्यांची टिप्पणी होती. या व्यतिरिक्त, मालदीवचे आणखी एक मंत्री अब्दुल्ला महझूम माजिद यांनी मालदीवला भारताकडून लक्ष्य केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आमच्या रिसॉर्टच्या पायाभूत सुविधा त्यांच्या बेटापेक्षा (लक्षद्वीप) चांगल्या आहेत. समुद्रकिनारी पर्यटनात मालदीवशी स्पर्धा करण्यासाठी भारताला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल, अशा आशयाची पोस्ट या मंत्र्यानं केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग करत, ही तुमची संस्कृती आहे, अशी टीका केली होती. मालदीवच्या मंत्र्याच्या या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय.
हेही वाचा -
- सोशल मीडियावर #Boycott Maldives ट्रेंड का होतंय? मोदींच्या लक्षद्वीप पोस्टचा काय संबंध?
- भारतीयांबाबतच्या वादग्रस्त पोस्टनंतर मालदीव बॅकफूटवर, सरकारनं जारी केलं निवेदन
- 'वास? कसला वास?' मालदीव प्रकरणावरून भडकले सेलिब्रेटी, कंगना रणौतची जळजळीत प्रतिक्रिया