नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रसार झाला असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना व्हॅक्सीनकडे लागले आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशामध्ये ड्राय रन सुरू करण्यासाठी सरकार तयारीला लागेल आहे. ऐन लसीकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, त्यांचे आधीच निरसरन करण्यासाठी ड्राय रन म्हणजेच लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येत आहे. ड्राय रन संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 31 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये आरोग्य मंत्रालायचे प्रमुख सचिव आणि राज्य, केंद्रशासित प्रदशांचे आरोग्य अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.
2 जानेवरी म्हणजेच आजपासून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे ड्राय रन सुरू करण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या राजधानीमध्ये तीन सत्रस्थळांमध्ये ड्राय रन सुरू करण्यात येत आहे. यामध्ये अशा काही राज्याचा देखील समावेश असेल जे दुर्गम भागात आहेत किंवा ज्यांच्याकडे संसाधनांचा अभाव आहे. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांत हे सराव सत्र त्यांच्या राजधानीव्यतिरिक्त इतरही प्रमुख शहरांमध्ये चालविण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांना डमी लस -
या लसीकरण मोहिमेची संपूर्ण योजना आरोग्य मंत्रालयाने 20 डिसेंबर 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार असेल. तीन सत्रस्थळांपैकी प्रत्येक ठिकाणी प्रभारी आरोग्य अधिकारी 25 लाभार्थ्यांची (आरोग्यकर्मचारी) निवड करतील. या लाभार्थ्यांना डमी लस देण्यात येईल. त्यानंतर या लाभार्थ्यांची सर्व माहिती को-विन अॅपवर नोंदवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. याचबरोबर लसीकरणासाठी योग्य जागा, साहित्य-साधनांचा पुरवठा, इंटरनेट जोडणी, वीज, सुरक्षा आदी सर्व गोष्टींनी संबंधित ठिकाण परिपूर्ण आहे की नाही याची माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.