नवी दिल्ली - अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी वाईट होत असताना भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानाने सुमारे 80 भारतीयांना शनिवारी काबुलमधून नेले आहे. हे विमान ताजिकिस्तानच्या दुशान्बे येथील विमानतळावर उतरविण्यात आले आहे. नवी दिल्लीजवळील हिनदोन या धावपट्टीवर हे विमान सायंकाळी पोहोचणार आहे.
सी-17 विमानाने केल्या दोन फेऱ्या
यापूर्वी भारताने अफगाणिस्तानमधील भारतीय राजदुतासह 200 भारतीयांना सी-17 या हवाईदलाच्या विमानाने भारतात आणळे आहे. तर सोमवारी अफगाणिस्तानमधून 40 भारतीयांना विमानाने भारतात आणले आहे. सी-17 विमानाच्या दुसऱ्या फेरीत 150 भारतीयांना मंगळवारी भारतात आणले. त्यामध्ये भारतीय राजदूत, अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि दुतावासामधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित
तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश सर्व मोठी गावे आणि शहरांसह काबुल ताब्यात घेतले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्यदल मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तालिबानींनी अफगाणिस्तानवर सत्ता मिळविली आहे. अमेरिकेच्या मदतीने भारताने अफगाणिस्तानमधून 200 भारतीयांना मायदेशी परत आणण्याची मोहिम पूर्ण केली आहे. काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
अफगाणिस्तानमध्ये आणखी 400 भारतीय असण्याचा अंदाज
अफगाणिस्तानमध्ये किती भारतीय आहेत, याची अचूक व तातडीने माहिती मिळविण्याला प्राधान्य असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांनी अफगाणिस्तान स्पेशल सेलला माहिती कळवावी, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये आणखी 400 भारतीय असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि इतर मित्र देशांच्या मदतीने भारतीयांना मायदेशी आणण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहे.