नवी दिल्ली :गेल्या काही वर्षांपासूनदेशाच्या आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आता क्षयरोगाचा अंदाज घेण्यासाठी देशातच डायनॅमिक मॅथेमॅटिकल मॉडेल विकसित करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, 'रोगाचा नैसर्गिक इतिहास, संसर्गाची वैयक्तिक स्थिती, रोग, आरोग्य सेवेची मागणी, चुकलेले किंवा योग्य निदान, उपचार कव्हरेज आणि उपचारांसह परिणाम आणि मृत्यू या आधारावर हे मॉडेल तयार केले गेले आहे.
दरवर्षी मार्चपर्यंत माहिती उपलब्ध होणार : या गणितीय मॉडेलसह, भारतातील टीबीच्या घटना आणि मृत्यूच्या अंदाजांची माहिती दरवर्षी मार्चपर्यंत उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, ही माहिती दरवर्षी ऑक्टोबरमध्ये अंदाज व्यक्त करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेपेक्षा सहा महिने आधीच उपलब्ध होणार आहे. या गणिती मॉडेलच्या सहाय्याने भारत भविष्यात राज्य स्तरावरही अशा प्रकारचे अंदाज बांधू शकतो. या अंदाजानुसार, भारतातील क्षयरोगाचा प्रादुर्भाव दर 100,000 लोकसंख्येमागे 196 एवढा आहे, जो डब्ल्यूएचओने 210 एवढा वर्तवला होता. तसेच या अंदाजानुसार, 2021 मध्ये संसर्गजन्य रोगांमुळे होणारे मृत्यू 4.94 लाखांऐवजी 3.20 लाख एवढे आहेत.