नवी दिल्ली - गेल्या मे महिन्यापासून पूर्व लडाखमधील भारत-चीन नियंत्रण रेषेवरील स्थिती तणावपूर्ण बनली आहे. चीनने आक्रमक धोरण स्वीकारत भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजनैतिक, लष्करी आणि विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चांतून तोडगा न निघाल्याने सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी सीमेवरील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे.
पँगाँग तलाव परिसरामध्ये भारतीय नौदलाने एलिट कमांडोजना (मार्कोस) तैनात केले आहे. तिथे पूर्वीच भारतीय वायू दलाचे गरुड कमांडोज आणि भारतीय लष्काराचे पॅरास्पेशल फोर्सेस तैनात आहेत. तिन्ही दलामध्ये एकता वाढवण्यासाठी आणि अत्यंत थंड हवामानात ऑपरेशन राबवण्यासाठी सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. तर तलावामध्ये ऑपरेशन राबवण्यासाठी सैनिकांना नव्या बोटीही मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनच्या हालचालींवर दुरून लक्ष -
लष्कर आणि वायु सेनाने सैन्याच्या तुकड्यांना जवळपास सहा महिन्यापूर्वी लडाखमध्ये तैनात केले होते. 29-30 ऑगस्टला विशेष सैन्यांच्या तुकडीचा उपयोग एलएसीसह उंच ठिकाणावर कब्जा करण्यासाठी केला होता. याचबरोबर चीननेही सीमेवर तैनात केले आहे. भारताने मागील काही दिवसांत मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवल्याने चीनच्या हालचालींवर दुरून लक्ष ठेवता येत आहे. तीव्र थंडीत लष्करी वाहने, तोफा आणि इतर यंत्रसामुग्रीची देखभाल हे एक मोठं आव्हान असतं. मात्र, त्याची पुरेशी व्यवस्था भारतीय लष्कराने आधीपासूनच करून ठेवली आहे.
सैन्यांची कामगिरी -
यापूर्वी नौदलाने वुलर तलाव परिसरात मार्कोस कमांडोजना तैनात केले होते. तर 2016 पठाणकोठ हल्ल्यानंतर काश्मीर घाटीमध्ये गरूड सैन्य तैनात केले होते. त्यानंतर गरुड सैन्याने आपले शौर्य दाखवत 26/11 हल्ल्यातील दहशतवादी जहीर उर रहमान लखवीच्या भाच्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या दहशतवादी गटाचा खात्मा केला होता. त्यामुळे गरूड सेनेला अशोक चक्र, तीन शौर्य चक्र आणि इतर अन्य शौर्य पुरस्कार देण्यात आले होते.
हेही वाचा -वाराणसीतील वीणकर मोदींना भेट देणार भगवान बौद्धांचा उपदेश असलेलं वस्त्र