बंगळुरू:कर्नाटकमध्ये 125 जणांना कोरोनाची लागण झाली. तर हसन, दक्षिण कन्नड आणि बंगळुरू शहरात प्रत्येकी व्यक्तीचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये मंत्रीमंडळ उपसमितीची आज बैठक घेण्यात येणार आहे.
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णाचे किती आहे प्रमाण? कोरोनात एकूण कोरोनाची 436 रुग्ण आहेत. त्यापैकी 400 रुग्ण होम केअरमध्ये आहेत. तर 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 7 जण हे आयसीयू तर 29 जण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. हसन जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या जेएन1 व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जनतेने घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, उपाययोजनांचे पालन करावे, अशा सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. कोविड रोगापासून होणारा धोका कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. कोविड नियंत्रणाकरिता काय पावले उचलावीत यावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावा, असा आरोग्य विभागाकडून नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे.
नवीन वर्ष साजरे करण्यावर निर्बंध नाही-60 वर्षांवरील आणि इतर आजार असलेल्यांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण वाढत असताना नवीन वर्ष साजरे करण्यावर कोणतेही बंधन लादण्याचा विचार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील पावले ठरवू, असेही आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
देशात किती आहेत कोरोना रुग्ण?रविवारच्या आकडेवारीनुसार देशात JN.1 चे 63 रुग्ण आढळले आहेत. त्यात गोव्यात आढळलेल्या 34 रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात नऊ, कर्नाटकात आठ, केरळमधून सहा, तामिळनाडूतून चार आणि तेलंगणामध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. देशात JN.1 चे सब-व्हेरियंट आढळून आले असले तरीही चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून काळजी घ्यावे, असा आरोग्यतज्ज्ञ सल्ला देतात.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या किती?
- आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे नवीन 28 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 153 वर पोहोचली आहे. तर JN १ चे एकूण नऊ रुग्ण आहेत. JN 1 चा सोमवारी एकही रुग्ण आढळला नाही.
- राज्यात कोरोनाचे 153 रुग्ण आहेत. त्यापैकी 142 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 11 इतर विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या 11 रूग्णांपैकी 2 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत तर इतरांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दक्षिण-पूर्व आशियातील देशांना कोव्हिडच्या नवीन व्हेरियंट, इन्फ्लूएंझा यासह श्वसन रोगांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणात्मक उपाय करण्याचं आवाहन केलं.
हेही वाचा-
- मुंबईच्या वेशीवर JN1, कशी घ्याल काळजी? काय आहे पालिकेची तयारी, घ्या जाणून
- सावधान! देशभरात कोरोना पसरतोय; कर्नाटकात एकाचा मृत्यू, चंदीगडमध्ये मास्क परतले