नवी दिल्ली - तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापिते केल्यानंतर काबूल विमानतळावर देश सोडणाऱ्यांची प्रंचड गर्दी होत आहे. अशा परिस्थितीतच गुरुवारी मध्यरात्री काबूलच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये जवळपास 72 नागरिकांचा बळी गेला. या घटनेचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारचा दहशतवाद आणि त्यांच्या कारवायांना मदत करणाऱ्या विरोधात जगाने एकत्र उभे राहिले पाहिजे, असे मतही भारताकडून व्यक्त करण्यात आले आहे.
या दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोटात कमीतकमी 60 अफगाणी आणि 12 अमेरिकन सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाण आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हा हल्ला ISIS-K या दहशतवादी संघटनेनी केल्याचे मान्य केले आहे.
काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबाप्रती आम्ही संवदेना व्यक्त करतो. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. अशा प्रकारचे हल्ल्यामुळे हे निश्चित आहे की, दहशतवाद आणि त्याला मदत करणाऱ्याविरोधात जगाने आता एक होणे गरजेचे आहे.