नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यदलातील 12 व्या चर्चेच्या फेरीची फलनिष्पत्ती दिसू लागली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीनच्या सैनिक मागे फिरले आहेत. दोन्ही देशांनी पाँईट 17 ए म्हणजे गोगरा येथील गस्त टप्प्याटप्प्याने, समनव्याने आणि पडताळणी करून थांबविल्याचे भारतीय सैन्यदलाने म्हटले आहे.
दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया 4 ते 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. दोन्ही देशांचे सैनिक हे त्यांच्या कायमस्वरुपीच्या तळावर पोहोचले आहेत. दोन्ही देशांनी तात्पुरते केलेल्या पायाभूत सुविधा परस्पर सामंजस्याने पडताळणी करून उद्धवस्त केल्या आहेत. गतवर्षी दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखमध्ये समोरासमोर उभे ठाकले होते. त्यापूर्वी जी स्थिती होती, तशी स्थिती झाल्याचे सैन्यदलाने म्हटले आहे.
हेही वाचा-न्यायाधीशांच्या संरक्षणाकरिता सीबीआयने काहीही केले नाही- सर्वोच्च न्यायालय
दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरूच राहणार-
प्रत्यक्ष ताबारेषेचे दोन्ही देशांकडून कठोरपणे निरीक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये एकतर्फी बदल करण्यात येणार नाही. या पद्धतीने संवेदनशील भागाचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. दोन्ही बाजुंनी चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी बांधिलकी दाखविण्यात आली आहे. पश्चिम भागात प्रत्यक्ष ताबारेषेनजीकच्या राहिलेले वाद सोडविण्यासाठी पुढे चर्चा सुरू ठेवण्यात येणार आहे. आयटीबीपी आणि भारतीय सैन्यदल हे देशाचे सार्वभौमत्व, शांतता आणि समानता ही पश्चिम भागात सीमारेषेनजीक ठेवण्यासाठी संपूर्णपणे वचनबद्ध आहे.