नवी दिल्ली India China Border :सरकारनंभारत-चीनच्या संवेदनशील सीमेवर इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या तीन बटालियन तैनात करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारनं अरुणाचल प्रदेशमध्ये ITBP ची आणखी बॉर्डर आउट पोस्ट (BOPs) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, केंद्रानं फेब्रुवारीमध्ये ITBP साठी सात अतिरिक्त बटालियन तयार करण्यास मान्यता दिली होती.
सीमाभागातील सुरक्षा वाढेल : नव्यानं मंजूर झालेल्या सात बटालियनपैकी, तीन आता तैनातीसाठी सज्ज आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अधिक ITBP चौक्या उभारण्यानं आणि नवीन बटालियन तैनात केल्यानं भारतीय सुरक्षा यंत्रणांना चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास मदत होईल. 'अधिक बटालियन्स तैनात केल्यानं आणि बीओपीची स्थापना केल्यानं सीमाभागातील सुरक्षा निश्चितच वाढेल, असं ब्रिगेडियर (निवृत्त) बीके खन्ना यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं. 'भारत-चीन सीमेवर अशी अनेक क्षेत्रं आहेत जिथे मनुष्यवस्ती नाही. अधिक बटालियन्सची तैनाती आणि बीओपीची स्थापना केल्यानं निश्चितपणे त्या भागात रहिवासी येतील', असं त्यांनी नमूद केलं.
या भागात पायाभूत सुविधांचा अपुरा विकास : हे खरं आहे की, मूलभूत सुविधांच्या अभावामुळं सीमावर्ती भागात राहणारे लोकं आपली जागा सोडून इतर ठिकाणी जातात. भारत आणि चीनमधील एकूण ३४८८ किमी सीमेपैकी अरुणाचल प्रदेश चीनशी ११२६ किमी सीमा शेअर करतो. जम्मू आणि काश्मीर (१५९७ किमी), हिमाचल प्रदेश (२०० किमी), उत्तराखंड (३४५ किमी) आणि सिक्कीम (२२० किमी) ही राज्ये देखील चीनशी सीमा शेअर करतात. सरकारी आकडेवारीनुसार, भारत-चीन सीमेचं पूर्णपणे सीमांकन झालेलं नाही. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं स्पष्टीकरण आणि पुष्टी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा उंचीवरील प्रदेश असल्यानं या भागात पायाभूत सुविधांचा अपुरा विकास झाला आहे.