नवी दिल्ली - चीनच्या आडमुठ्या व हेकेखोर स्वभावामुळे दोन्ही देशांदरम्यान सीमेवर तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. यातच मोठी बातमी समोर येत आहे. चीनच्या 54 अॅप्सवर भारत सरकारने बंदी ( Govt Bans 54 Chinese Apps ) घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या अॅप्समुळे भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अॅप्सवर बंदी घालण्यात येत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले.
बॅन करण्यात येत असलेले हे 54 चीनी अॅप कथितपणे युजर्सकडून विविध परवानग्या घेतात आणि संवेदनशील डेटा संकलित करतात. संकलित केलेल्या रीअल-टाइम डेटाचा गैरवापर केला जात असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
बंदी घातलेल्या अॅप्सच्या यादीमध्ये -
स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा - सेल्फी कॅमेरा, गॅरेना फ्री फायर - इल्युमिनेट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ऑनम्योजी अरेना, अॅपलॉक आणि ड्युअल स्पेस लाइट यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार हे अॅप्स प्लेस्टोरवरून हटवण्यात येत आहेत.