नवी दिल्ली : पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून ड्रोन खरेदीला मंजुरी दिली आहे. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात होणाऱ्या चर्चेनंतर 30 MQ-9B प्रीडेटर सशस्त्र ड्रोन खरेदी करण्याच्या कराराची घोषणा केली जाऊ शकते.
लादेनला याच ड्रोनने मारले होते! : चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या काळात भारताची ही ड्रोनची खरेदी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या खरेदीवर चीन आणि पाकिस्तानचीही नजर आहे. विशेष म्हणजे, 2011 मध्ये अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन आणि जुलै 2022 मध्ये काबूलमध्ये अयमान अल-जवाहिरीला मारण्यासाठी अमेरिकेने हेच ड्रोन वापरले होते. भारतीय नौदलाला 14 ड्रोन मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी 8 ड्रोन मिळतील.
संरक्षण मंत्र्यांच्या चर्चेनंतर मंजुरी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या (डीएसी) बैठकीत जनरल अॅटोमिक्सकडून शस्त्रास्त्रयुक्त 'हंटर-किलर' ड्रोन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रीडेटर ड्रोन भारताला चीनसह हिंद महासागर क्षेत्रात पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करण्यास मदत करेल. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी राजनाथ सिंह यांच्याशी विस्तृत चर्चा केल्यानंतर सुमारे 10 दिवसांनी बहुप्रतिक्षित खरेदीला मंजुरी मिळाली. एवढेच नाही तर मोदींच्या वॉशिंग्टन दौऱ्यात भारतात जीई-414 फायटर जेट इंजिनच्या निर्मितीच्या कराराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
प्राणघातक सशस्त्र ड्रोनबद्दल जाणून घ्या :
- MQ-9B ड्रोन हे MQ-9 'रीपर' चा एक प्रकार आहे ज्याचा उपयोग हेलफायर क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती प्रक्षेपित करण्यासाठी केला गेला होता.
- हे ड्रोन सागरी पाळत ठेवण्यास सक्षम आहे. ते पाणबुडी शोधून नष्ट करू शकतात. दूरवरून हवेतील लक्ष्य नष्ट करू शकतात. याशिवाय, ते भूसुरुंग नष्ट करण्यासह विविध भूमिका बजावू शकतात.
- हाय-अल्टीट्यूड लाँग-एंड्युरन्स (HALE) ड्रोन 35 तासांपेक्षा जास्त काळ हवेत राहण्यास सक्षम आहेत.
- ते चार हेलफायर क्षेपणास्त्रे आणि सुमारे 450 किलो बॉम्ब वाहून नेऊ शकतात.
- MQ-9B ड्रोनच्या दोन आवृत्त्या आहेत - स्काय गार्डियन आणि सी गार्डियन ड्रोन.
- हे पहिले हंटर-किलर मानवरहित एरियल व्हेईकल (UAV) आहे जे लांब पल्ल्याच्या आणि उच्च उंचीवर पाळत ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
- यात ऑनबोर्ड इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन इंटेलिजन्स सिस्टीम एकत्रित केल्या आहेत.
भारताने दोन ड्रोन भाड्याने घेतले होते : 2020 मध्ये, भारतीय नौदलाने हिंद महासागरात पाळत ठेवण्यासाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी जनरल अॅटॉमिक्सकडून दोन MQ-9B सी गार्डियन ड्रोन भाड्याने घेतले होते. नंतर भाडेतत्त्वाची मुदत वाढवण्यात आली. हिंद महासागर क्षेत्रात पीएलए युद्धनौकांकडून वारंवार होणार्या हल्ल्यांसह चीनच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदल आपली देखरेख यंत्रणा मजबूत करत आहे.
चीनसोबतच्या गतिरोधानंतर ही खरेदी महत्त्वाची : चीनकडून पूर्व लडाखमधील गतिरोधानंतर अशा प्रकारच्या सर्व्हिलन्स ड्रोनची खरेदी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारताने रिमोटली पायलटेड विमानांचा ताफा वापरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) रात्रंदिवस निगराणी लक्षणीयरीत्या वाढवली आहे. आता अशा ड्रोनने मोठी मदत होणार आहे.
हेही वाचा :
- JK Kupwara Encounter : कुपवाडामध्ये पाच विदेशी दहशतवाद्यांना धाडले यमसदनी; लष्करी जवानांकडून शोधमोहीम सुरूच
- Jammu Kashmir : पूंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा केला जप्त