भोपाळ : ७० वर्षांपूर्वी देशात नामशेष म्हणून घोषित झालेला एक प्राणी आता पुन्हा दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून काही चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. या नामशेष झालेल्या प्राण्याचे देशात पुन्हा स्वागत करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने चित्त्यांची आयात करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात दक्षिण आफ्रिकेहून काही चित्ते आणण्यात येणार आहेत. या चित्त्यांसाठी वन विभागाने अभयारण्यात विशेष विभागही तयार केला आहे. यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच वन विभागाला निर्देश देण्यात आले होते. नोव्हेंबरअखेर पर्यंत हे चित्ते भारतात येण्याची शक्यता आहे.
७३ वर्षांपूर्वी शेवटचा दिसला चित्ता..
सरगुजा महाराज रामानुशरण सिंग यांचा १९४७मध्ये चित्त्यांसोबत घेण्यात आलेला फोटो, हा भारतातील चित्त्यांचा शेवटचा फोटो मानन्यात येतो. त्यानंतर १९५२मध्ये देशातून चित्ता नामशेष झाल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले होते.