नवी दिल्ली -कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा प्राप्त केला आहे. भारताने गुरुवारी 100 कोटी लसींच्या डोसचा ऐतिहासिक आकडा पार केला. कोविडच्या विरोधात नऊ महिन्यातच ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे. 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पार केल्यावर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. ते सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि आरोग्य सेवकांशी चर्चा करतील. त्याचवेळी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया लाल किल्ल्यावरून कैलाश खेर यांनी गायलेल्या ऑडिओ व्हिज्युअल चित्रपटाचे लोकार्पण करणार आहेत.
16 जानेवारीपासून सुरू झाली लसीकरण मोहीम -
देशात कोरोना लसीकरण मोहीम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोविड -19 लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा सुरू केला. ऑक्सफोर्ड, अॅस्ट्राझेनेका आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोवाशील्डच्या आपत्कालीन वापरास सरकारने मंजुरी दिली होती. 18 सप्टेंबर रोजी देशभरात लसीचे 25 दशलक्ष डोस देण्यात आले. लस देण्यासाठी देशभरात 52,088 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी 50,056 सरकारी केंद्रे आहेत, जिथे मोफत लस दिली जात आहे. तर 2,032 खाजगी आहेत.
लसीकरणात यूपी प्रथम क्रमांकावर, संपूर्ण डोसमध्ये महाराष्ट्र अव्वल