नवी दिल्ली : देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यासाठी नागरिक उत्साही आहेत. राजधानी दिल्ली स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील. त्यानंतर देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करतील.
कधी असेल अभिभाषण : राष्ट्रपतींचे भाषण संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. राष्ट्रपतींचे भाषण आकाशवाणीच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाईल. दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रपतींचे भाषण प्रसारित केले जाईल. ऑल इंडिया रेडिओ रात्री साडेनऊ वाजता आपल्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर प्रादेशिक भाषेत या भाषणाचे प्रसारण करेल.
विशेष पाहुणे : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी केंद्राने विविध व्यवसाय करणाऱ्यांना आमंत्रित केले आहे. सुमारे 1,800 लोक त्यांच्याबरोबरच्या इतर निमंत्रितांसह विशेष पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहतील. यंदाच्या कार्यक्रमात अनेक गावांचे सरपंच, किसान उत्पादक संघटना योजनेचे प्रतिनिधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे लाभार्थी, सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचे कामगार, खादी कामगार, प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमार यांचा सहभाग असणार आहे. तसेच प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपरिक पोशाखात येण्यास सांगण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना : मंगळवारी शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी दिल्ली पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पहाटे 4 ते 10 वाजेपर्यंत लाल किल्ल्याकडील वाहतूक सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. या परिसरातील वाहतूक फक्त स्वातंत्र्यदिनासाठीच्या अधिकृत वाहनांसाठी खुली असेल. शहरातील 8 रस्ते सामान्य जनतेच्या वाहतुकीसाठी बंद असतील. नेताजी सुभाष मार्ग, लोथियन रोड, एसपी मुखर्जी मार्ग, चांदणी चौक रोड, निषाद राज मार्ग, एस्प्लानेड रोड आणि त्याचा नेताजी सुभाष मार्गापर्यंतचा लिंक रोड, राजघाट ते आयएसबीटी आणि बाह्य रिंग रोड, आयएसबीटी ते आय पी फ्लायओव्हर या रस्त्यावरील वाहतूक बंद असेल. उत्तर-दक्षिण भागातून शहरात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना अरबिंदो मार्ग, सफदरजंग रोड, कमल अतातुर्क मार्ग, कौटिल्य मार्ग, एसपी मार्ग, 11 मूर्ती, मदर तेरेसा क्रिसेंट, पार्क स्ट्रीट, मंदिर मार्ग, पंचकुला रोड, राणी झाशी रोड, येथील पर्यायी मार्ग घ्यावा लागेल.
हेही वाचा-
- Independence Day : पंतप्रधान मोदींनी बदलला सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटो; 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
- Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिन 2023; जाणून घ्या 15 ऑगस्टलाच का साजरा केला जातो हा दिवस