नवी दिल्ली : १५ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतील. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती आणि स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र या ध्वजासाठी वापरण्यात येणारी दोरी कुठून येते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याची अत्यंत मनोरंजक (Independence Day 2023) अशी स्टोरी आहे.
दिल्लीची एक फर्म सरकारला मोफत दोरी पुरवते : राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी गोरखी मल धनपत राय जैन फर्मद्वारे सरकारला कोणतेही शुल्क न घेता पुरवली जाते. दिल्लीच्या सदर बाजार, कुतुब रोड, तेलीवाडा येथे ही फर्म आहेत. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज भारतात आला तेव्हा किंग्सवे कॅम्प येथे दिल्ली दरबार आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून ही फर्म सुरू आहे. फर्मचे मालक नरेश चंद जैन यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी या दोरीशी संबंधित ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, १९४७ पासून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांना आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना येथूनच दोरी पाठवली जाते.
दोरी कशी बनवली जाते : नरेश जैन यांनी सांगितले की, २००१ मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथमच मोफत दोरी देण्यात आली होती. त्यानंतर देशाच्या सर्व पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना मोफत दोरी दिली जात आहे. नरेश चंद यांनी सांगितले की, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना दिली जाणारी दोरी बनवताना विशेष काळजी घेतली जाते. दोरी कशी बनवली जाते, हे सुरक्षेच्या कारणास्तव उघड केले जात नाही. यासाठी एक प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत काम केले जाते.