बाप्पाची मनोभावे पूजा -गणेशोत्सवात गणेशभक्त आपल्या प्रिय गणेशाला ( Shri Ganesha ), बाप्पाला अत्यंत मनोभावे घरी आणतात. दहा दिवस त्याची मनोभावे पूजा करतात. घरी मंदिरांमध्ये, मंडळांमध्ये भक्तीभावाने पूजा करतात, दुर्वा वाहतात, नैवेद्य दाखवितात, आरती करतात. सुखकर्ता दुखहर्ता… असे म्हणताना अवघ्या महाराष्ट्रातील वातावरण मंगलमय झालेले असते. त्याच मंगलमय वातावरण काही गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवून या उत्सवाला सामाजिकतेचे अधिष्ठान देण्यात आले आहे. यावर्षीचा गणेशोत्सव जवळ आला आहे आणि गणेश भक्त तयारीला लागले आहेत. यंदाही एक गाव एक गणपतीची ( One village one Ganesha ) परंपरा शेकडो गावांमध्ये सुरू राहणार आहे.
एक गाव एक गणपती –अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती ( One village one Ganesha ) संकल्पना राबविली जात आहे. संपूर्ण गावात सर्वांचा मिळून एकच गणपती स्थापन केला जातो. गावात दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाते. अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवात जमा झालेल्या वर्गणीमधून गावाच्या विकासासाठी काही कामे केली जातात. अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा आता रुढ होऊ लागली आहे.
कोईलची ७०० वर्षांची प्राचीन परंपरा - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कोईल गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ परंपरा आहे. विशेष म्हणजे ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. साडे सहाशे-सातशे वर्षांची प्राचीन अशी परंपरा असल्याचे वाडवडील सांगतात. गावातल्या प्रत्येकाच्या घरी गणपती मूर्तीची स्थापना केली जाते, परंतु गावात मात्र सर्वांचा मिळून एकच गणराय असतो. गावाचे ग्रामदैवत गणपती हेच आहे. गावामध्ये गणपती मंदिर असून मंदिरातील मूर्ती काळ्या दगडाची आहे. याच मूर्तीभोवती गणेशोत्सवात आरास केली जाते. सर्व ग्रामस्थ मंदिरात एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी करतात, अशी प्रथा आहे.
४९ वर्षांची उर्से गावाची परंपरा – पालघरमधील डहाणू तालुक्यातील उर्से गावात गेल्या ४९ वर्षांपासून “एक गाव एक गणपती” उपक्रम राबविला जात आहे. यंदा या उपक्रमाचे ५० वे वर्ष असणार आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील कुणबी आणि आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या ‘उर्सें’ गावाने ‘एक गाव एक गणपती’ ( One village one Ganesha ) उत्सव साजरा करीत सर्वप्रथम सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. एक-दोन नव्हे सलग ४९ वर्षांपासून उर्से गावात एक गाव एक गणपती ही परंपरा निर्माण झाली आहे. सर्व गावकरी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गौरी उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला यासह असे सर्वच सण भक्तिभावाने एकत्रितरित्या साजरे करतात. सुमारे अडीच-तीन हजारांची लोकसंख्या असलेल्या या गावाचा आदर्श पुढे अन्य गावांनीही घेण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या काळात गावात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांना मदत –उर्से गावाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असे की, गणपती विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. श्री गणेशावरील आपली भक्ती दाखवित ग्रामस्थ सर्व वस्तू चढ्या दराने अतिशय आनंदाने खरेदी करतात. यातून उरलेले पैसे गरजू शेतकऱ्यांना व्याजाने दिले जातात. पुढच्या वर्षी याच पैशातून सण केले जातात.