कानपूर :जिल्ह्यात एका झोपडीला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा संपूर्ण कुटुंब झोपडीत झोपले असताना ही घटना घडली. या भीषण आगीत पती, पत्नी आणि 3 निष्पाप मुलेही जळाली आहेत. त्याचवेळी या अपघातात एक नवजात आणि एक वृद्ध व्यक्तीही आगीत होरपळून निघाली. दोघांनाही गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. झोपडीला आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे.
पाचही जणांचा जळून मृत्यू : पोलीस अधीक्षक बीबीजीटीएस मूर्ती यांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा रुरा पोलीस स्टेशन हद्दीतील हरमाऊ बंजारा डेरा येथे एका झोपडीला आग लागली. या अपघातात सतीश (वय - 30) आणि काजल (वय - 26) या तीन मुलांसह सनी (वय - 6), संदीप (वय - 5), गुडिया (वय - 3) यांचा होरपळून मृत्यू झाला. झोपडीला आग लागली तेव्हा घरातील सर्व सदस्य झोपले होते. त्यामुळे ते बाहेर पडू शकले नाही. आरडाओरडा ऐकून गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून बादलीतून पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत कुटुंबातील पाचही जणांचा जळून मृत्यू झाला होता. आग विझविताना मृत सतीशची आई गंभीर भाजली गेली.