मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सीरमला देणार भेट -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या युनिटच्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. आज दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मोदी तेजपूर विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला करणार संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता आसामच्या तेजपूर विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील.
शरद पवार कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर -
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली व कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तर सांगलीत शिराळ्याचे आमदार मानसिंग नाईक यांच्या वडिलांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
म्हाडाच्या ५ हजार ६४७ सदनिकांची सोडत -
आज पुणे विभागातील 5 हजार 647 घरांसाठी लॉटरी फुटणार आहे. या लॉटरीत ९२ हजार ३३५ पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत. महत्वाचे म्हणजे यावेळी 68 भूखंडाची ई लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याचे म्हाडाकडून सांगितले आहे. पुणे मंडळाने पुणे, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पातील 5 हजार 647 घरांसाठी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन अर्ज मागवले होते. याला इच्छुकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळेच या लॉटरीसाठी 92 हजार 335 अर्ज सादर झाले आहेत अजित पवार यांच्या हस्ते होणार सोडत.
लसीकरण लाभार्थ्यांशी मोदी साधणार संवाद -
भारतात जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू आहे. पीएम नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून वाराणशीत कोरोना लसीकरणाचे लाभार्थी व कोरोना योद्ध्यांशी संवाद साधणार आहेत.