महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - आजच्या घडामोडी

या घडामोडींवर असणार खास नजर

NewsToday
NewsToday

By

Published : Jul 27, 2021, 6:32 AM IST

  • राज कुंद्राला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याला अश्लील फिल्मच्या निर्मितीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने कुंद्राची रवानगी 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली होती. ही कोठडी आज संपणार असून, राज कुंद्राला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सकाळी 8 वाजता ते शिरोळ येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर अजित पवार हे कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करतील. दुपारी ते अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात, प्रमुख कार्यकर्त्यांची घेणार भेट

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक, पुण्यानंतर आता ठाण्यात हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे आज आपल्या पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेणार असून पक्षातील कार्यकर्त्यांची मनोबल वाढावे तसेच कार्यकर्त्यांना नव्याने काम करण्यासाठी हुरूप वाढवा यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

  • ऊर्जामंत्री महाड, पेण व नागोठणेच्या दोऱ्यावर, वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार

रायगड -अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. महाड, नागोठणे व पेण येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज या परिसराचा दौरा करणार आहेत.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस

मुंबई - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पुरामुळे अनेक मृत्यू झाले आहेत तर अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी असला तरी राज्यातील या आपत्तींमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ई-मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

  • शरद पवार यांची आज पत्रकार परिषद

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईतील नवीन राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दुपारी 11.30 वाजता ही पत्रकार परिषद आहे. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

  • आज भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामना

कोलंबो- आज भारत विरुद्ध श्रीलंका टी - 20 सामना होणार आहे. कोलंबो येथील मैदानावर रात्री आठ वाजता हा सामना रंगणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details