गोकुळ दूध संघाचे सत्ताधारी आज ठरणार.. चुरस शिगेला
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघासाठी कोरोना काळातही तब्बल 99.78 टक्के इतके मतदान झाले. अनेक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करत दोन्ही गटांनी मतदानाआधीच आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत सत्ताधारी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही गटांतील या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतात याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.
जे. पी. नड्डा बंगाल दौऱ्यावर -
पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर होताच बंगालमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत. या घटनांचा भाजपने निषेध केला असून भाजप त्याविरोधात देशभरात निर्देशने करणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आजपासून दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. ते कोलकाता परिसरातील हिंसक घटना घडलेल्या स्थानांची पाहणी करतील.
आज आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन -
प्रत्येक वर्षी चार मे राजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस साजरा केला जातो. 1999 पासून प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसांची सुरूवात २ डिसेंवर १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत पाच अग्निशमन जवानांच्या झालेल्या मृत्यूनंतर करण्यात आली.
मुंबईत १८ व ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आजपासून -
मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षावरील लसीकरण गेले चार दिवस बंद होते. ते लसीकरण आज मंगळवार पासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे