नवी दिल्ली :युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील दिवसेंदिवस चिघळत चाललेली स्थिती पाहता इथे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी आणण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले आहेत. याशिवाय मझार-ए-शरीफ इथून भारतीयांना घेऊन एक विशेष विमान मंगळवारी सायंकाळी राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात दिवसेंदिवस तालिबानचे वर्चस्व वाढत असून इथे संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.
भारतीयांना तातडीने मायदेशात आणा
अफगाणिस्तानातून हवाई प्रवास बंद होण्यापूर्वी तिथल्या प्रोजेक्ट साईटवर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशात आणावे असे निर्देश सरकारने अफगाणिस्तानात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांना दिले आहेत. अफगाणिस्तानात काम करणाऱ्या भारतीयांनीही आपल्या कंपन्यांना देशात परत जाण्याची सोय करून देण्याची विनंती करावी अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
मझार-ए-शरीफमधून भारतीयांना घेऊन येणार विशेष विमान
अफगाणिस्तानातील मझार-ए-शरीफ इथून भारतीयांना घेऊन एक विशेष विमान मंगळवारी सायंकाळी राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. ज्या भारतीयांना यातून यायचे असेल त्यांनी तातडीने आपले पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक आणि त्याची शेवटची तारीख 0785891303, 0785891301 या दोन व्हाटस्अॅप क्रमांकांवर पाठवावी असे आवाहनही भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानातील स्थिती चिघळली
अमेरिकेने सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानातील पाच प्रांतांच्या राजधानीवर ताबा मिळविला आहे. अमेरिकेचे सैन्य 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील संघर्ष सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या महिनाभरात इथे संघर्षात हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार शाखेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.
हे युद्ध आता अफगाणिस्तानचे
पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे. हा त्यांचा देश आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे वा काय करू नये हा त्यांचा निर्णय आहे'. अफगाणिस्तानातील युद्ध हे स्पष्टपणे योग्य दिशेने जात नाहीये असेही त्यांनी म्हटले आहे. तालिबानने आणखी काही प्रांतांवर ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानपासून अंतर घेतल्याचेच यावरून दिसत आहे.