हैदराबाद/गांधी नगर:गुजरात चक्रीवादळ येण्यापूर्वी कच्छ-सौराष्ट्र जिल्ह्यांमधील किनारपट्टीपासून 10 किमी अंतरावरील गावांतील नागरिकांचे मंगळवारपासून स्थलांतर सुरू झाले आहे. चक्रीवादळापासून कमी नुकसान होण्यासाठी गुजरात सरकारकडून काळजी घेण्यात येत आहे. गुरुवारी संध्याकाळी कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ 150 किमी प्रति तास वेगाने चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
लोकांना गावांमधून बाहेर काढणे आणि बंदर क्षेत्रातील कामे थांबविणे याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे. किनारपट्टी भागात सखल भागात राहणाऱ्या सुमारे 7,500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची गुजरातच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कांडला बंदरातील सर्व कामे बंद करून तेथील कामगारांसह 3,000 लोकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. कच्छ जिल्ह्यात देशातील सर्वात मोठे सार्वजनिक क्षेत्रातील दीनदयाल बंदर आहे. येथील कामे बंद केल्यामुळे बंदराच्या गेट्ससमोर मालवाहू ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. दीनदयाल बंदर प्राधिकरणातील सर्व कामे बंद करण्यात आली आहेत. 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करून तयारी करण्यात आली आहे. चक्रीवादळापूर्वी सखल भागातील सर्व कामगार आणि मच्छीमारांना बाहेर काढण्यात आले आहे.
रेल्वेने 16 जून रोजीच्या गाड्या रद्द केल्या- उत्तर पश्चिम रेल्वेने काही नियोजित रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्रीवादळ बिपरजॉय 16 जून रोजी नैऋत्य राजस्थानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता लक्षात घेऊन बंगालच्या उपसागरातील काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. पाच रेल्वे गाड्या मूळ स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत. तर नऊ रेल्वे गाड्यांच्या सेवा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, जोधपूर आणि उदयपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 15 जूनच्या दुपारनंतरच वादळ आणि पाऊस सुरू होईल, असा हवामानाचा अंदाज आहे.
सहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे स्थलांतरण:गुजरातचे आयुक्त आलोक पांडे म्हणाले की, चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या 300 ते 400 किमी अंतरावरून ताशी 15 किमी वेगाने गुजरातकडे सरकत आहे. 6 जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर या सहा जिल्ह्यांमध्ये शाळांना सुटी देण्यात आले आहेत. गुजरातमधील द्वारका, पोरबंदर, जामनगर, कच्छ आणि गीर सोमनाथ या जिल्ह्यांतील एकूण 25 तालुके सागरी किनाऱ्यावर आहेत. सध्या गरोदर महिला, बालके, आजारी व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्राधान्य देत आहे. वादळ जसजसे गुजरातच्या दिशने येत आहे, तसा धोका वाढत आहे.
वाऱ्याचा वेग ताशी 60 किमीपर्यंत वाहतूक होणार बंद:सहा जिल्ह्यांतील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.सर्व जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बायोटीमही तैनात करण्यात आल्या आहेत. जेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 60 किमीपर्यंत पोहोचेल तेव्हा सर्व वाहतूक, रेल्वे, रस्ते देखील बंद होतील. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या सुमारास गुजरातमधील जामनगर, द्वारका आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकारी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मुख्य सचिव राजकुमार यांच्यासोबत 1 तास व्हिडिओ कॉन्फरन्स घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री आज घेणार बैठक:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉयचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, विज्ञान भवनात दिवसभर चाललेल्या बैठकीदरम्यान, गृहमंत्री शाह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व संभाव्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सूचना देणार आहेत.
हेही वाचा-
- Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळावर पंतप्रधान मोदींची आढावा बैठक, किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतरण सुरु
- Cyclone Biparjoy updates: बिपरजॉय बनले धोकादायक, गुजरातच्या सात जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस; मुंबईतील जोरदार वादळामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम
- Monsson update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास, मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता