नवी दिल्ली -कोरोनाचा देशात कहर असून रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी रात्र-दिवस काम करत आहेत. तर दुसरीकडे रामदेव बाबा यांनी आपल्या वक्तव्यातून डॉक्टरांच्या भावना दुखवल्या आहेत. रुग्णांच्या मृत्यूला अॅलोपॅथीची औषधे जबाबदार असल्याचे विधान रामदेव बाबा यांनी केले आहे. यामुळे असोसिएशन संतप्त असून रामदेव बाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयएमएने यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
बाबा रामदेव यांच्या विधानाचा भारतीय वैद्यकीय संघटनेचे सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी विरोध दर्शविला. कोरोना काळात केवळ भारतच नाही. तर जगभरातील कोट्यावधी लोक अॅलोपॅथी उपाचार पद्धतीमुळे कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण केवळ 3 टक्के आहे. या सर्व रूग्णांवर अलोपॅथीच्या औषधांवर उपचार सुरू आहेत. कधीकधी रुग्णाला ऑक्सिजनची गरज असते, तर कधी आयसीयू तर कधी व्हेंटिलेटरची. या सर्व सुविधा अॅलोपॅथी प्रणालीतच येतात, असे सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी म्हटलं.
कोरोना साथीच्या वेळी कमीतकमी 1200 ते 1300 डॉक्टरांचा मृत्यू झाला. या डॉक्टरांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्याऐवजी व त्यांच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी संपूर्ण अॅलोपॅथी प्रणालीवर प्रश्न उपस्थित करून त्यांनी चूक केली आहे. कोरोनावर रुग्णालयात नव्हे तर घरी उपचार केले जाऊ शकतात, असा संदेश त्यांच्या विधानातून जात आहे, असे लेले म्हणाले.