नवी दिल्ली -अलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करुन योगगुरु बाबा रामदेव चांगलेच अडचणीत आले आहेत. योगगुरु रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद आणखी वाढीस लागला आहे. बाबा रामदेव यांनी आयएमएला 25 प्रश्न विचारून आव्हान दिले होते. आता आयएमएने रामदेव बाबांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. यासंदर्भातील पत्र आयएमएने रामदेव बाबा यांना पाठवले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे रामदेव बाबांना पत्र आयएमए उत्तराखंडचे सचिव डॉ अजय खन्ना यांनी रामदेव बाबा यांना पत्र पाठवले आहे. रामदेव बाबा आणि त्यांच्या टीमचे सदस्य आचार्य बालकृष्ण यांनी आयएमएच्या डॉक्टारांसोबत खुली चर्चा करावी. आयएमएचे डॉक्टर तुमच्या 25 प्रश्नांची उत्तरे देतील. तसेच तुम्हाला डॉक्टरांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तसेच चर्चा कधी व्हावी, हे तुम्ही निर्धारीत करा तर चर्चा कुठे व्हावी, हे आयएमए ठरवेल, असे डॉ अजय खन्ना यांनी रामदेव बाबांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
आयएमएकडून रामदेव बाबांना खुल्या चर्चेचे आव्हान रामदेव बाबा यांनी दावा केला होता, की त्यांनी आतापर्यंत हजारो अलोपॅथी रुग्णालयातील रुग्णांना बरे केले आहे. यावर आयएमएने संबंधित रुग्णांची आणि त्या रुग्णालयाची माहिती मागवली आहे.
बाबा रामदेव यांनी 8 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांना ज्ञान नाही. त्यांचे बोलणे आयएमएने गंभीरपणे घेऊ नये. डॉक्टारांनी रामदेव बाबांकडे दुर्लक्ष करावं. शिक्षित समाजातील लोक आपले कार्य करत आहेत. कोरोना संकटात कोण चांगले कार्य करत आहे, हे लोकांना समजतंय, असे आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यअक्ष आणि केंद्रीय समितीचे सदस्य डॉ डी डी चौधरी यांनी म्हटलं.
रामदेव बाबा आणि आयएमएमधील वाद -
रामदेव बाबा नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. त्यानुसार आता त्यांनी अलोपॅथी डॉक्टर आणि कोरोना उपचारपद्धती विरोधात वादग्रस्त विधान करत मोठ्या वादाला सुरुवात केली. अलोपॅथी उपचार पद्धतीमुळेच आज लाखो लोकांचा जीव गेला आहे. अलोपॅथी हे मुर्ख सायन्स आहे. तर दोन लस घेऊनही 10 हजार डॉक्टर आणि एक लाख लोक दगावले आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबाने केले. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आयएमएने तर रामदेव बाबावर थेट देशद्रोहाचा खटला दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. तसे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे आयएमएच्या उत्तराखंड शाखेने रामदेव बाबांना 15 दिवसांमध्ये माफी मागावी नाहीतर 1 हजार कोटींची दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी डॉ लेले यांनी दिल्लीतील एका पोलीस ठाण्यात रामदेव बाबा विरोधात तक्रारही दाखल केली आहे.