नवी दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे विविध राज्यातील नेते याप्रकरणी भाजपला जबाबदार धरत आहेत. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या आवाजासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी मी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
खासदारकी रद्द - राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निव़डून आले होते. 2019 मध्ये कर्नाटकमधील भाषणादरम्यान त्यांनी मोदी आडनावावर भाष्य केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकसभा सचिवालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होणार आहे. राहुल गांधी यांना 102(1) अंतर्गत अपात्र ठरविण्यात आल्याचेही या अधिसूचनेत म्हटले आहे. यासोबतच लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 8 देखील नमूद करण्यात आले आहे.
प्रियंका गांधी, शरद पवारांची प्रतिक्रिया -राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर शरद पवार, प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. आपले संविधान वाचवण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले, तर प्रियंका गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच भाजप नेते रोजच गांधी परिवाराबद्दल बोलत आहेत. माझ्या भावाने अदानी विषय लोकसभेत मांडल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सरकार आम्हाला घाबरत असल्याचेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.