भारतीय कुटुंबात बऱ्याचदा एक विरोधाभास दिसून येतो, तो म्हणजे मुलांना शिस्त लावण्यावर जास्त कष्ट घेतले जात नाहीत. पण मुलींना मात्र उठता बसता शिस्त शिकवली जाते. चांगलं, नीट वागण्यास सांगितलं जातं. पण खरंच हे योग्य आहे का? एकीकडे आपण स्त्री पुरुष समानतेच्या बाता मारतो आणि दुसरीकडे आपल्याच घरात मुलांना आणि मुलींना वेगळी वागणूक देतो. यावर अनेक जण कारण देतात की, मुली दुसऱ्यांच्या घरी जाणार असतात त्यामुळे त्यांना शिस्त लावणे गरजेचे आजे. पण या लोकांच्या हे लक्षात येत नाही की, आपल्या मुलाला जर योग्य शिस्त लावली नाही तर, उद्या त्याची जोडीदार म्हणून जी स्त्री नांदेल तिला किती त्रास होईल. एवढचं काय लहानाचा मोठा होईपर्यंत सुद्धा ते मुल किती बेफिकीर होईल, म्हणून प्रत्येक पालकाने मुलींप्रमाणे आपल्या मुलांना देखील शिस्त लावली पाहिजे आणि एक चांगला माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली पाहिजे. आजच्या या विशेष लेखातून आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या मुलाला शिकवल्यात तर तुमचे कुटुंब नेहमी सुखी राहील. Parenting News
संवेदनशिलता जपणे : अनेकदा पालक आपल्या मुलाला बोलतात की, 'काय मुलींसारखा रडतो?' हा टोमणा आपल्या मुलाला मारणे म्हणजे आपण स्वत:हून त्याला वाईट प्रवृत्तीकडे ढकलण्यासारखे आहे. अशामुळे त्या मुलाच्या मनातील पुरुषी भावना वाढवून तो स्त्रियांना तुच्छ लेखू शकतो. याशिवाय आपण कोणाच्याही भावनांना नियंत्रित करू शकत नाही, तसे करणे हे चुकीचे आहेत. मुलांना रडायला, संवेदनशील राहायला सांगा, वेळीच त्यांना आपलं मन हलकं करण्याची शिकवण द्या. यामुळे तुमच्या मुलाचं मन संवेदनशील आणि भावनिक होईल. एक चांगला व्यक्ती होण्यासाठी असे मन असणे गरजेचे आहे.
स्त्रियांचा आदर : या काळातील ही अतिशय मौल्यवान आणि महत्त्वाची शिकवण आहे, जी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना द्यायला हवी. ही शिकवण आईने मुलाला दिल्यास उत्तम, कारण ती स्वत: एक स्त्री असल्याने अतिशय उत्तमपणे त्याला समजावू शकते. स्त्रियांचा आदर कसा करावा हे शिकवू शकते. यामुळे तुमचा मुलगा एक चांगला माणूस म्हणून मोठा होईल आणि त्याचा तुम्हालाच अभिमान वाटेल. जर प्रत्येक पालकाने आपल्या मुला स्त्रियांचा आदर करायला शिकवला तर स्त्रियांवरील अत्याचार सुद्धा आपसूकच कमी होतील.