हैदराबाद - बीआरएस पक्ष सत्तेत आल्यास नागरिकांना मोफत वीज देणार असल्याची घोषणा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली. तरुणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेली अग्निपथ योजना गुंडळणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सभेत जमलेला प्रचंड जनसमुदाय हे देशातील सत्ता बदलाची नांदी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते खम्मम येथील जनसभेला संबोधित करत होते. यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, सीपीआयचे जनरल सचिव डी राजा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आदींची उपस्थिती होती.
बीआरएसची रॅली :तेलंगाणामधील खम्मम येथे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वात बीआरएसच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी बोलताना केसीआर यांनी देशात तेलंगाणा मॉडेल लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली. बीआरएस सत्तेत आल्यावर नागरिकांना मोफत वीज देण्यात येईल. शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि वीज पुरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीआरएस एलआयसीसाठी उभारणार लढा :तेलंगाणा राष्ट्र समितीचे रुपांतर आता बीआरएसमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी खम्मम येथे बीआरएसच्या मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री एकवटले होते. यावेळी बोलताना केसीआर यांनी बीआरएस एलआयसीसाठी मोठा लढा उभारणार असल्याचे जाहीर केले. एलआयसीचे एजंट, कर्मचारी बीआरएसला भक्कम पाठिंबा देणार असल्याचे केसीआर यांनी यावेळी सांगितले. बीआरएस एलआयसीला मजबूत करणार असल्याचेही केसीआर यांनी यावेळी जाहीर केले.