अहमदाबाद ICC CWC 2023 India vs Pakistan : अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये विश्वचषकातील बहुप्रतीक्षित भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी शहरातील बहुतांश पंचतारांकित हॉटेलच्या खोल्या उच्च दरानं बुक करण्यात आल्या आहेत. या सामन्यापुर्वी परदेशातील अनिवासी भारतीय आणि राज्यातील क्रिकेटप्रेमींनी शहरातील पंचतारांकित हॉटेल्सबरोबरच गेस्टहाऊस, पीजी सुविधा असलेल्या खोल्या, क्लब गेस्टहाऊसपासून सामान्य हॉटेल्सपर्यंतच्या सर्व खोल्या बुक केल्या आहेत.
बहुतांश हॉटेल्स हाऊसफुल्ल : प्रसिद्ध हॉटेल चेन 'हयात रेसीडेन्सी'शी संबंधित असलेल्या रीनानं ईटीव्ही भारतला दूरध्वनीवरून सांगितलं की, अहमदाबादेतील आश्रम रोडवर असलेल्या हयात रेसीडेन्सीमध्ये खोल्या उपलब्ध नाहीत. फक्त प्रीमियम डिप्लोमॅट सूट उपलब्ध आहेत. या सूटचं 24 तासांचं भाडं करासहीत 2.40 लाख रुपये आहे. तसंच शहरातील वस्त्रापूर येथील हयात हॉटेलमधील रुमचं शुल्क 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी करासह 75 हजार रुपये असेल. यात नाश्त्याचाही समावेश असणार आहे.
एका रुमचं भाडं लाखाच्या जवळ : अहमदाबादच्या रामदेवनगर इथं असलेल्या 'कंट्री मॅरियट' हॉटेलचं वातावरण शहरातील इतर पंचतारांकित हॉटेल्ससारखंच आहे. 'कंट्री मॅरियट' हॉटेलमधील एका खोलीची किंमत 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी 70,000 रुपये आणि 18 टक्के करासह 82,600 रुपये असेल, असं 'कंट्री मॅरियट' येथे डेस्कवर काम करणाऱ्या जीतनं ईटीव्ही भारतशी फोनवर बोलताना सांगितलं. आयपीएलची टीम 'कंट्री मॅरियट' हॉटेलमध्ये राहायची आणि वर्ल्डकप सामने सुरु होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंडचे क्रिकेट संघ इथं राहायचे.