जयपूर : जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांची धाकटी बहीण IAS रिया डाबी बोहल्यावर चढली आहे. रियाने महाराष्ट्र केडरचे आयपीएस मनीष कुमारशी लग्नगाठ बांधली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस मनीष कुमार यांचे कॅडर महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये बदलल्यानंतर हे लग्न उजेडात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये केडर बदलण्याचे कारण राजस्थान कॅडरच्या आयएएस रिया डाबीसोबत लग्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटिफिकेशन आणि दोघांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रिया डाबीचे अभिनंदन होत आहे.
दोघेही 2021 बॅचचे अधिकारी : IAS रिया डाबी आणि IPS मनीष कुमार हे दोघेही UPSC 2021 बॅचचे आहेत. दोघांमध्ये आधी मैत्री होती, नंतर या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले. घरच्यांच्या मान्यतेनंतर दोघांनी परस्पर संमतीने कोर्ट मॅरेज केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच विवाहाच्या आधारावर, नियमांनुसार मनीष कुमारने केडर बदलण्यासाठी अर्ज केला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने तो अर्ज स्वीकारुन 16 जून रोजी केडर बदलाची अधिसूचना जारी केली.