भोपाळ -भोपाळमधील एका आयएएस महिला अधिकाऱ्याने सोशल मीडियावर टि्वट करत एका घटनेचा संदर्भ देत फोनवरील आपले बोलणे तिसरी कोणीतरी व्यक्ती ऐकत असल्याचे म्हटलं आहे. त्यांचे हे ट्विट ( bhopal ias officer tweet on Phone Tapping ) सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. आयएएस महिला अधिकाऱ्याने एका पेनाच्या जाहिरातीचा फोटोही टि्वट केला आहे. प्रीती मैथिल नायक असे या आयएएस महिला अधिकाऱ्याने नाव आहे.
एखाद्या आयएएस अधिकाऱ्याने फोन टॅपिंगवर भाष्य केल्याची ही मध्य प्रदेशातील पहिलीच घटना आहे. प्रीती मैथिल नायक यांनी ट्विटरवर लिहिले की, हे खूप भीतीदायक आहे. आदल्या दिवशी एका परिषदेत माझा पेन हरवला. पेन महाग असल्याने मी ते शोधण्यासाठी काही कॉल केले. तो पेन हॉल किंवा लॉबीमध्ये सापडतो की नाही हे पाहण्यासाठी मी माझ्या PA ला देखील कॉल केला. यानंतर मला माझ्या फेसबुक पेजवर पेनासंदर्भातील जाहिराती दिसून लागल्या. माझा पेन हरवला ही गोष्ट फेसबुकपर्यंत पोहोचली. त्यांच्या या पोस्टनंतर युजर्संनी विविध कॉमेंट केल्या असून हे प्रकरण फोन टॅपिंगशी जोडत प्रश्न केले आहेत.
यावर 'मला फोन टॅपिंग म्हणायचे नाही. आपण मोबाईलवर बोलतो. ते कोणीतरी तिसरी व्यक्ती ऐकत आहे. त्यामुळेच आपल्या आवडीच्या गोष्टी गुगल किंवा सोशल साईटवर दिसायला लागतात. हे अत्यंत चुकीचे आहे. आता काहीही सुरक्षित नाही', असेही नायक यांनी म्हटलं.